ठाणे : खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड आगीचे आगार बनले आहेत अशी माहीती शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली आहे.
खारीगाव नाक्यावरील फूटपाथवरील गॅरेजमध्ये ठेवलेल्या २० ते ३० भंगार गाड्या, चैतन्य सोसायटी, गणेश मंदिर, नागनाथ म्हात्रे तलाव, दत्त वाडी परिसरातील फूटपाथ गॅरेज, तेथे ठेवलेल्या भंगारातील गाड्या ९० फूट रस्त्यावरील बसेस, गोडाऊन, प्लॅस्टिक हरि पाटील उद्यान येथील स्वामी समर्थ ६० फूट रस्ता, श्री पुष्प सोसायटी, करुणा सोसायटीच्या बाजुला ठाण्याच्या साकेतमधील सर्व भंगार व भंगार गाड्या आणून ठेवलेल्या आहेत. यामुळे शेजारील स्वामी समर्थ, सोहम किर्ती, लक्ष्मी निकेतन, श्री कुंज, वासुदेव पार्क, शिवराज हाईट्स या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कळवा येथील पारसिक नगर मधील ओमसाई सोसायटीला लागुन असलेल्या ठाणे महापालिकेच्या राखीव भूखंडावरील स्क्रॅपयार्डमध्ये मोठ्याप्रमाणात भंगार साहित्य व कचरा साठवून ठेवण्यात आला होता. या भंगाराने व कच-याने पेट घेतल्याने नुकतीच भीषण आग लागली होती. या पार्श्वभूमीवर खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड आगीचे आगार बनले आहेत, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिलेल्या निवेदनात, शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.