ठाणे:भगवान श्री. श्याम खाटू संकिर्तन महोत्सव या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटु दरबारचा जागर करण्यात आला. प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे,मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे,स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या.तर, माजी महापौर नरेश म्हस्के,माजी खासदार आनंद परांजपे,माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हणमंत जगदाळे, मालती रमाकांत पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कोंडुस्कर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने १८ एप्रिलपर्यंत नऊ दिवस चैत्र नवरात्रोत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरु आहे. यानिमित्ताने, महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री. श्याम खाटू यांची पूजा केली जाते. राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्वपूर्ण स्थान आहे. भगवान श्री. श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्यावतीने साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्री श्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळयाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गायकांनी अनेक प्रसिद्ध भजने गात भगवान खाटूंचे स्मरण केले. या भजनांमध्ये शेकडो भाविक तल्लीन झाले होते. खाटू भगवान बरोबरच प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री हनुमानाची सुश्राव्य भजने सादर करण्यात आली. या भजनांच्या ठेक्यात भाविकांनी नृत्य करीत खाटू महाराजांचा जयजयकार केला. माता शेरावाली, खाटूवाला खाटूवाला निले घोडेवाला, चलो बुलावा आया है… आदी भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा… जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लुटला.
दरम्यान, देवीची नयनरम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची रिघ लागलेली असते. याठिकाणी दररोज सकाळी अल्पोपहार तसेच दुपारी व रात्री महाभंडाऱ्याची मोफत अन्नछत्र सुविधा आयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे