ठाणे, :- खासदार श्री.राहुल गांधी व माजी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत दि.15 मार्च 2024 रोजी प्रवेश करणार असून सोनाळे, ता. भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तसेच दि.16 मार्च 2024 रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार आहे. खासदार श्री. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे. त्यानुषंगाने खा.श्री.राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांचे ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात प्रवेश निर्गमित होईपर्यंत नागरिकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी थांबणाऱ्या ठिकाणी अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदीर परिसर, नदीनाका शेलार तसेच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात यातायात होऊ नये, याकरिता या ठिकाणांमध्ये पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर व ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (9) नुसार दि.15 मार्च 2024 रोजी दुपारी 1.00 वा. ते दि. 16 मार्च, 2024 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत या कालावधीत पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी करणेबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.