आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

ठाणे slider महाराष्ट्र

 

ठाणे- भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा , आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली होती. हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतर करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना दि.2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ब्रिटिशांनी फाशी दिली होती. ह्या महान क्रांतिवीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी स्मारक उभारण्यात आले होते. परंतु अनेक वर्षांपासून ह्या स्मारकाची दुरवस्था झाल्याने ते अडगळीत पडले होते. या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भांगरे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्मारक परिसराची पाहणी करून तत्कालीन कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वांतत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरूपात फलकावर लावण्यात याव्यात , अशी मागणी अनिल भांगले यांनी केली होती. अखेरीस आदिवासी क्रांती सेना, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान,व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली. त्यानुसार या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या 2 मे 2024 रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना याच नूतनीकृत स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे, असे आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *