अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी
ठाणे (11) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करुन ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला, त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे आदीनी आयुक्तांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले व अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, मा. अजितदादा पवार यांनी शासनस्तरावर महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्याच पध्दतीने मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील लोकहित साधणारा सन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. ठाणे शहराच्या हिताच्या व विकासाच्या सर्वांगिण दृष्टीने अनेक योजना व विकासाची कामे यामध्ये घेतली आहेत. ज्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत उपलब्ध करून दिली त्याच धर्तीवर आपण ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना 50% सवलत उपलब्ध करून दिली असून याचा निश्चितच फायदा महिलांना होणार आहे.
तसेच, ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वय 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता, परंतु आता वय 60 वर्षे अशी आपण वयाची मर्यादा केलेली असल्याने 60 वर्षावरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार असून आयुक्तांनी उचललेले हे पाऊल म्हणजे राज्यातील इतर महापालिकेंसमोर एक आदर्श असणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
तसेच महापालिकेच्या माध्यमातून महिला सुरक्षितता योजने अंतर्गत ठाणे पोलीस सेवेतील महिलांना 25 ॲक्टीवा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा उपयोग महिला पोलीसांना त्यांच्या कामामध्ये होणार आहे, असा उपक्रम राबविणारी ठाणे ही पहिली महानगरपालिका आहे.
महापालिकेच्या रुग्णालय व प्रसुतीगृहांमध्ये प्रसुत होणाऱ्या मातांना मुख्यमंत्री मातृत्व भेट म्हणून किट देण्याचे जाहीर केले होते, ज्याचा उपयोग मातेला स्वत:ची व नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी होणार आहे, त्याचाही लाभ ठाणे शहरातील महिलांना होणार असून या अर्थसंकल्पातही या योजनेसाठी पुरेशी तरतूद उपलब्ध केलेली आहे. तसेच सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन त्यांचे सक्षमीकरण व जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीकोनातून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी या आर्थिक वर्षातही धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे हे ही या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे श्री. म्हस्के यांनी नमूद केले आहे.
महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यास उत्तेजन देण्यासाठी महापालिकेच्या समन्वय बँकाकडून कर्ज उपलब्ध करुन देणे, बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्ज फेडणाऱ्या बचत गटांना व्याजाच्या स्वरुपात सबसिडी देणे या बाबींचा देखील समावेश केला आहे, यामुळे महिला बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळण्याची शाश्वती राहील तसेच महापालिका समन्वय करणार असल्याने बँका देखील अशा बचत गटांना व्यवसायासाठी सहजगत्या कर्ज उपलब्ध करुन देतील. या उपक्रमासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात ” महिला बचत गटांना शून्य व्याज दराने कर्ज योजना” या लेखाशीर्षांतर्गत रु. 1 कोटी तरतूद प्रस्तावित केल्याबद्दलही श्री. म्हस्के यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले आहे. महिलांसाठी विशेष शौचालय, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याणकारी योजना, मूकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान, तृतीय पंथीयासाठी योजना, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकी महाविद्यालयाचे अद्ययावतीकरण आदींचा देखील समावेश आहे.
एखादया व्यक्तीचे निधन झाल्यावर दहनविधीसाठी येणारा खर्च हा दु:खद समयी कुटुंबीयांच्या दु:खात भार टाकणारा असतो. अंत्यविधीचा खर्च हा सामान्य कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकणारा असतो. याचा विचार करुन ठाणे महानगरपालिकेने सर्व प्रकारचे दहन विधी मोफत देणेचे ठरविले आहे. यासाठी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात ” मोफत दहनविधी सेवा” या लेखाशीर्षांतर्गत रु.2 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे, याचा फायदा निश्चितच गरीब व गरजू नागरिकांना होणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीची सोय उपलब्ध नव्हती. याबाबत पाळीव प्राण्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे स्वच्छ हवा कृती आराखड्या अंतर्गत प्राप्त अनुदानातून ॲनिमल Incinerator च्या उभारणीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करणार असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे, याचबरोबर पाणीपुरवठा व्यवस्था, मलनि:स्सारण प्रकल्प, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना, बंदिस्त नाल्यावर पार्किंग व्यवस्था, ठाणे मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक आदी विविध योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केल्याबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.