लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार :- एच. के. पाटील

मुंबई

*केंद्रातील व राज्यातील अपयशी भाजपा सरकारची पोलखोल करणार:- नाना पटोले*

*शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवू पहाणा-या मनुवादी भाजपाविरोधात राज्यभर जनजागृती करणार.*

*काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा.*

मुंबई, दि. १३ जुन.
कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, माजी मंत्री अस्लम शेख, आ. अमिन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, मोदी सरकाराने मागील ९ वर्षात लोकशाहीचा गळा घोटला आहे. शेतकरी आंदोलनावेळी सरकारविरोधातील ट्वीट डिलीट करण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला होता हे उघड झाले असून मोदी सरकारच्या राज्यात माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवरही घाला घातला होता. ह्या सरकारचा परभाव करणे हे आता काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,
शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रातून शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या डझनभर नेत्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने अपमान केला. आताही वर्षानुवर्षे शांततेने पार पडत असलेल्या वारी मध्ये गोंधळ घालून वारी परंपरा संपवण्याचे प्रयत्न केला. वारकऱ्यांवर लाठीहल्ला करूनही लाठीहल्ला झालाच नाही असा कांगावा सरकार करत आहे. महाराष्ट्रातील या जातीवादी मनुवादी सरकारच्या विरोधात राज्यभर जगजागृती केली जाणार आहे.
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ईडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई सारखे प्रश्न घेऊन काँग्रेस नेते राज्यभर दौरा करून पोलखोल केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात 16 तारखेला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे असे नाना पटोले म्हणाले.

दोस्त दोस्त ना रहा..
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व सुरुळीत सुरु आहे. मतभेद हे शिंदे फडणवीस सरकार मध्ये सुरु झाले आहेत. शिंदे यांनी सर्व वर्तमानपत्रात जाहीरात देऊन फडणवीस पेक्षा आपणच लोकप्रिय आहोत असे सांगत फडणवीसांची गोची केली आहे. फडणवीस यांना आता ‘दोस्त दोस्त ना रहा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *