ठाणे: वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले आहेत.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे मनपा प्रशासनाने बंद केला होता. हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर, ब्रह्मांड, लोढा अमारा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती. हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकूम येथील राम मारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. परिणामी या रस्त्यांवर देखिल प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुध्द दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती. तसेच वयोवृध्द नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अपघाताचीही भिती होती.
स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवाराम भोईर, मा. नगरसेविका उषा संजय भोईर, मा. नगरसेवक भुषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हायलंड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.