ठाणे :ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील, याची माहिती घेणे हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
सोमवारी सायंकाळी झालेल्या या पाहणी दौऱ्यास आनंदनगर, कोपरी येथून सुरूवात झाली. ठाण्याचे प्रवेशद्वार, सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली. दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यानंतर, ठाणे पूर्व सॅटीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कला दालने व व्यवस्था यांची माहिती घेतली. महापालिकेने उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांच्या निगा व देखभालीचा खर्च निघेल अशा पद्धतीने या वास्तूंची भाडे आकारणी केली जावी, अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या. अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रितसर करारनामा करण्यात यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
तीन हात नाक्यावरील वाहनांचा होणारा खोळंबा हा ठाणेकराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन उपायांबाबत विचार सुरू असल्याचेही, तीन हात नाका, मॉडेला मिल नाका येथील वाहतुकीच्या परिचलनाची माहिती घेतल्यावर, आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील चौक आणि रस्ते अरुंद झाले आहेत. ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. त्या दृष्टीकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग करण्याची आवश्यकता असून त्यांची नोंद घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर, आयुक्तांनी रायलादेवी तलावाच्या एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.
किसन नगर येथील मिनाताई ठाकरे प्रसूतीगृहाचे बळकटीकरण आणि अत्याधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच, त्या गर्भवती मातांचा विचार करून येथे लिफ्ट सुविधा देण्यासाठी आराखडा सादर करण्यास बांधकाम विभागाला सांगितले.
वागळे इस्टेट भागात पडवळनगर येथील शौचालय, रोड. नं. २२ येथील सुशोभीत करण्यात आलेले सर्कल यांची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचबरोबर, जयभवानी नगर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.
किसननगर येथील क्लस्टर योजनेतील कामांच्या प्रगतीचा आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. क्लस्टरसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहे, याचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी महापालिकेकडून जे सहकार्य लागेल ते देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. क्लस्टरबाबत आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा तसेच येथील नागरिकांचे राहणीमान बदलण्यासाठी क्ल्स्टर ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या कालबद्ध पूर्णत्वासाठी लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसह बैठकही आयोजित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
वर्तकनगरमधील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आयुक्तांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधांची माहिती घेत त्यांनी तेथील प्रशिक्षणार्थी, ग्रंथपाल यांच्याशी संवाद साधला.
उपवन येथील घाट, कारंजे यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला भेट दिली. तेथील सुविधा आणि व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे संचालक महादेव जगताप, घाणेकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक अजय क्षत्रिय आदी अधिकारी उपस्थित होते.