ठाणे:- “वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एक दाढीवाला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला …”या ऐवजी…”ठाण्यातील एक दाढीवाला गेली वीस वर्षे सत्तेची सर्व महत्वाची पद भोगत होता. जेव्हा चौकशीच्या भितीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्वच घेऊन गेला…” असा हल्लाबोल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांनी धर्मवीर- 2 चित्रपटाच्या ट्रेलर चा समाचार घेतला आहे.
धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर मधील संवाद हे खोटे आणि संदर्भहीन असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे . धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा न वापरता एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या जीवनावर चित्रपट काढावा असा हल्लाबोल केदार दिघे यांनी ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
“यापुढे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला मिठी मार…” हा धर्मवीर 2 च्या चित्रपट निर्मात्यांनी जो संवाद दिघे साहेबांच्या तोंडी घातला आहे, तो एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मोठी करण्यासाठी दिघे साहेबांना छोट दाखवण्यासाठी घेण्यात आला आहे. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दिघे साहेब शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या आड कशासाठी येतील?म्हणजे चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्याच हिंदुत्वावर विश्वास नाही का? असाही प्रश्न केदार दिघे यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना विचारला आहे.
दिघे साहेब हिंदुत्वाच्या आड येऊ शकतात असं चित्रपट निर्माते आणि शिंदे यांना म्हणायचं आहे का?
2000 ला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब हयात असताना शिंदेंना दिघे साहेब असं का सांगतील?
आणि जर असं दिघे साहेबांनी शिंदेंना 2000 साली सांगितलं असेल तर बाळासाहेबांनी 2009 ला काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे होते? असा सवाल पत्रकार परिषदेत विचारून केदार दिघे यांनी शिंदे आणि चित्रपट निर्मात्यांची कोंडी केली आहे.
मुळात आपल्या पक्षाच्या भूमिका घेण्याचा सर्वाधिकार हा शिवसेना पक्ष नेतृत्वाला असतो हेच मान्य करायला शिंदे तयार नाहीत. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे अंतिम असतात ते पक्षाच्या हिताचे असतात हे शिंदेंना मान्य नाही. स्वतःला पक्षापेक्षा, बाळासाहेब ठाकरे,दिघेसाहेब, मातोश्री, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठे समजायला लागल्यानेच शिंदेंच्या डोक्यात अशा पद्धतीची हवा गेली आहे… आपण केलेली वाईट कृत्ये लपवण्यासाठी चित्रपट काढून प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे!
या चित्रपटांमध्ये अजून एक गंभीर संवाद चित्रपट निर्मात्यांनी आणि मिंधेनी टाकला आहे…”वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता…”बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य खंबीर नेतृत्व पाठीशी ठामपणे असताना दिघे साहेब कुणापासून बेसावध होते? असा प्रतिसवाल केदार दिघे यांनी चित्रपट निर्मात्यांना केला आहे.
अशा संवादामुळे वीस वर्ष सत्तेची सर्व पदे भोगणारे शिंदे शिवसेना नेतृत्व, पक्षाचे कार्यकर्ते आणि दिघे साहेब यांच्यामध्ये एक दरी निर्माण करू पाहत आहेत…
“वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एक दाढीवाला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला …”
या ऐवजी…”ठाण्यातील एक दाढीवाला गेली वीस वर्षे सत्तेची सर्व महत्वाची पद भोगत होता. जेव्हा चौकशीच्या भितीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्वच घेऊन गेला…” असा डायलॉग हवा होता असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.