ठाणे:आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला.
प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी, कवी अशोक बागवे, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी संपन्न झाले.
सविता राणे यांच्या बुक कल्चर मधील एक लहान मूल वर्षाला 100 पुस्तके वाचत आहे. लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरु केली आहे. ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत संदीप माळवी यांनी व्यक्त केले. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतांनाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही त्यांनी कौतुक केले. प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत बाल वाचक कट्टा आयोजित करण्यास अति. आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले.
कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे सुरु केलेल्या बुक कल्चर चळवळीचे त्यांनी कौतुक केले.
बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये 2000 हून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचेही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नाही असे मत व्यक्त केले.