ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले.
सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते.
रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले.
वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधिक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.
रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.