ठाणे : मॉरिशसमधील मराठी नृत्य आणि नाट्य कलाकारांनी साकारलेली अनोखी कलाकृती पाहण्याची संधी राज्यातील रसिकांना मिळणार आहे. मॉरिशस मराठी क्लचरल सेंटर ट्रस्ट (एमएमसीटी) यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम १० ते १९ एप्रिल या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचे सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे प्रयोग झाले असून बुधवार, १७ एप्रिल रोजी ठाण्यात सायंकाळी ६ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे त्यांचा प्रयोग होणार आहे.
सहा नृत्य कलाकार आणि चार नाट्य कलाकार असा हा संच आहे. डिसेंबर-२०२३मध्ये ‘एमएमसीटी’ने आयोजित केलेल्या नृत्याविष्कार स्पर्धेतील हे कलाकार आहेत. तर, नाट्य कलाकारांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ‘एमएमसीटी’चे अध्यक्ष आणि सांस्कृतिक प्रकल्पाचे शिल्पकार अर्जून पुतला हे करत आहेत.
ठाण्यातील प्रयोग, बुधवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वा. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे होणार आहे. या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, ‘एमएमसीटी’ने केले आहे.