नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

राजकारण slider महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत श्री.फडणवीस बोलत होते. या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेनंतर महायुतीने विधान भवन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या भव्य मिरवणुकीने श्री. गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना श्री.गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी “नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती आहेत” अशा शब्दांत श्री.गडकरी यांचा गौरव केला. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने केलेले कार्य हा एक ट्रेलर आहे. देशाला विकसित, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरेच काही घडायचे आहे. मोदींजींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षांत गरीबीमुक्त, बेरोजगारी मुक्त व समता युक्त भारत घडवायचा आहे. पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केला आहे त्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षांत रोवली जाणार असून त्यासाठी मोदीजींना सलग तिस-यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असा निर्धार श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *