ठाणे:- ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) सर्व बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देण्यात यावी. त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी परिवहन सेवेच्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा नेहमीच अग्रेसर असतो. महिलांची आर्थिक सक्षमता, तसेच अर्थव्यवस्थेतील आणि विविध सामाजिक उपक्रमातील महिलांचे योगदान या बाबींना चालना मिळावी यासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषत्वाने कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना समान संधीचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. तरी सर्व महिलांना या दृष्टिकोनातून सुयोग्य वातावरण मिळावे यासाठी ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला विषयक उपक्रम हाती घेतले आहेत.
त्यापैकीच, परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, या उद्देशाने ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ती सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत, निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी यात होणारा कालपव्यय आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले. तसेच, वाहक, तिकीट निरिक्षक यांना याबद्दल तातडीने माहिती द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
तसेच, परिवहन सेवेच्या बसेसमध्ये, गर्दीच्या वेळेची प्रवासी संख्या व महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता महिलांना बसेसमध्ये आसन मिळत नसल्याने त्यांचा प्रवास त्रासदायक ठरून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये डाव्या बाजूकडील सर्व सिट्स (दरवाजाकडील बाजू) महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत, असे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. बसगाड्यांच्या उपलब्धतेनंतर गर्दीच्या वेळी ठराविक मार्गावर स्वतंत्र महिला बस सेवा सुरू करण्याचेही प्रयोजन असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.