महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विजयी करण्यासाठी कपिल पाटील यांचे आवाहन

भिवंडी ठाणे

भिवंडी: कोकणासह ठाणे जिल्ह्यातील युवाशक्तीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी कार्य केले आहे. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील सर्व स्तरांतील प्रश्न मांडून ते सोडविणाऱ्या महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले.
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भिवंडी शहरातील ओसवाल हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आज उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, सौ. नीलिमा डावखरे, लोकसभा समन्वयक जितेंद्र डाकी, हरिश्चंद्र भोईर, रामनाथ पाटील, यशवंत सोरे, छत्रपती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोकणातील पाच जिल्ह्यात पसरलेल्या पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने मांडले. कोकणातील युवा शक्तीच्या प्रगतीसाठी ते कार्य करीत होते. पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे प्रश्न मांडण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यांना विकासकार्य करण्याची संधी पुन्हा देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. भिवंडी शहरात ३०९६ व भिवंडी ग्रामीणमधील ३ हजार २४१ मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशवासियांनी पसंती दिल्याने पुन्हा `एनडीए’चे सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारकडून भातपिकासह विविध पिकांच्या आधारभूत किंमती वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून विविध लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असतानाच, महाराष्ट्र सरकारनेही काल पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही मोफत उपचार लागू केले. राज्य सरकारमध्ये शिक्षकांसह विविध पदांच्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय महायुतीच घेऊ शकते, असे नमूद करून श्री. कपिल पाटील यांनी भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *