ठाणे कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांवर कोणत्याही स्वरुपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच, ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रिज घेऊन येणाऱ्या डम्परमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्यासंदर्भात पालिकेची कार्यवाही यांची माहिती या बैठकीत दिली.
कांदळवनाच्या बाबतीत, कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी आहे. सर्वप्रथम सीआरझेड हद्दीपासून ५० मीटरच्या बफर झोनचे तत्काळ सीमांकन करण्यात यावे. जेणेकरून कांदळवनाचे नेमके क्षेत्र निश्चित होऊन सहाय्यक आयुक्त यांना कार्यवाही करणे शक्य होईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरुपाची भरणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्याच्या सीआरझेड हद्दींचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तत्काळ करण्यात यावे, असे निर्देश राव यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत. त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप होईपर्यंत शहर विकास विभागाने ढोबळमानाने मोजणी करून त्या जागांवर भराव टाकला जाऊ नये, असे फलक तत्काळ लावण्यात यावेत, असेही राव यांनी स्पष्ट केले.
आनंदनगर चेक नाका, मुलुंड चेक नाका आदी ठिकाणी तातडीने २४ तासांसाठी तीन पाळ्यांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात यावीत. या गस्ती पथकातील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत. या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारे डेब्रिज रोखले जावे, असेही राव यांनी सांगितले. टप्प्याटप्पाने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर अशा पद्धतीने गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत.
खारेगाव टोलनाक्या लगत कांदळवनावर सुरू असलेल्या भरावाबाबत तत्काळ उपाययोजना करण्यासाठी या कांदळवन परिसराकदे जाणाऱ्या सगळे वाटा अडवल्या जाव्यात, अशी सूचना राव यांनी केली. तिथे साठलेल्या भरावाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असेही राव म्हणाले.
दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाले आहे. तेथील बायो मायनिंगसाठीचा निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. आचारसंहितेनंतर कार्यादेश दिला जाईल. या पावसाळ्यात येथील गाळमिश्रित पाणी वाहून ते खाडीत जाणार नाही यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना करण्याचे निर्देश राव यांनी घनकचरा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.
या बैठकीत, कोकण विभागीय कांदळवन व पाणथळ जागा संरक्षण आणि संवर्धन समितीचे सदस्य दयानंद स्टॅलीन यांनी कांदळवनांवर होत असलेल्या अतिक्रमणांकडे गांभीर्याने पाहण्यास सांगितले. तसेच, कोणतीही पाणथळ जागा अधिसूचित होण्याची वाट न पाहता तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम, उपायुक्त (परिमंडळ १) मनीष जोशी, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कोकण विभागीय कांदळवन व पाणथळ जागा संरक्षण आणि संवर्धन समितीचे सदस्य दयानंद स्टॅलीन, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सचिन बोरसे, अक्षय गुडदे, प्रितम पाटील, बाळू पिचड, सोपान भाईक आदी उपस्थित होते.
*नागरिकांना आवाहन*
कांदळवन क्षेत्र किंवा त्यालगत असलेल्या सीआरझेड हद्दीत नागरिकांनी कोणतेही बांधकाम करू नये. तसेच, अशा जागेतील चाळी, इमारती यात घरे घेऊ नये. कांदळवन संरक्षणाबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी बांधकामे अनधिकृत असून ती जमीनदोस्त करण्यात येतील. त्यामुळे घर खरेदी करताना सीआरझेडच्या नियमांचा भंग झालेला नाही, याची खात्री करूनच नागरिकांनी घरे घ्यावीत. त्यासाठी महापालिकेच्या स्थानिक प्रभाग समितीत चौकशी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांना नागरिकांना केले आहे.