ठाणे 24 : ठाणे शहरातील राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या, विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा उद्या रविवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10 वा. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास श्री. कपिल पाटील, राज्यमंत्री, पंचायत राज मंत्रालय हे प्रमुख अतिथी म्हणून तर श्री. शंभूराजे देसाई, पालकमंत्री ठाणे, श्री. रवींद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी सर्वश्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, प्रमोद पाटील, डॉ. जितेंद्र आव्हाड, ॲङ निरंजन डावखरे उपस्थित राहणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
सकाळी 10 वा. पोखरण रोड नं. 2 येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर व महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पोखरण रोड नं. 2 येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेकडील सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह व शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तदनंतर 11.00 वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मुख्य सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास ठाणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांनी केले आहे.
………………………………………………………………………..