अंदमान निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पोर्टब्लेयर/मुंबई दि. 26- महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मीयांना सोबत घेवुन रिपब्लिकन पक्षाचे संघटन येथे मजबुत करणार. येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आर पी आय एनडीए भाजपची सत्ता निश्चीत येणार असल्याचा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पोर्टब्लेयर येथील डॉ.बी.आर. आंबेडकर ऑडीटेरीयम येथे रिपब्लिकन पक्षाच्या अंदमान निकोबार प्रदेशच्या शाखेच्या स्थापनेनिमीत्त आयोजित जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.
यावेळी अंदमान निकोबार या केंद्रशासीत प्रदेशच्या रिपब्लिकन पक्षाची कार्यकारिणी ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या अंदमान निकोबार केंद्रशासीत प्रदेशच्या अध्यक्षपदी राहुल राम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. तर सरचिटणीस पदी संदीप लाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अंदमान निकोबार प्रदेशच्या रिपाइं युवक आघाडीच्या अध्यक्षपदी गुरप्रीत सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची ना. रामदास आठवले यांनी अधिकृत घोषणा केली.
डॉ. बी.आर. आंबेडकर ऑडीटेरीयम मध्ये अंदमान निकोबारमधील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. त्यापुर्वी डाँ. बी.आर. आंबेडकर भवन येथील महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास ना. रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. अंदमान निकोबारची भुमी ही ऐतिहासीक असुन एक प्रेरणादायी भुमी आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे येथे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती या अंदमान निकोबारच्या भुमीमध्ये आहेत. येथील सेल्युलर जेल ला ना.रामदास आठवले यांनी भेट दिली.
रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन अंदमान निकोबारमधील सर्व जाती धर्मीयांना एकत्र आणण्याचे काम आपण करणार आहोत. अंदमान निकोबारला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवुन देणार आहोत. कोणत्याही जाती धर्मीयांच्या भारतीय व्यक्तीला रिपब्लिकन पक्षात प्रवेश खुला आहे. असे सांगत अंदमान निकोबार मधील जनतेने आगामी 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला साथ देण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.