“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या ९५ हजार अर्जांची विक्रमी वेळेत छाननी: ठाणे महापालिकेचा पहिल्या टप्प्यातील यशस्वी उपक्रम”

Uncategorized


*ठाणे:राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार ०३ ऑगस्ट ते सोमवार ०५ ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती. शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रांमध्ये अखंडीतपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली. त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचे नियोजन केले. त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीने काम मार्गी लावले.
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय १३७ मदत केंद्रे सुरू केली आहेत. वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रुमही तयार करण्यात आली आहे. या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाइन पद्धतीने पात्रता निश्चिती करण्यात आली. त्यात, ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता.
ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे कौतुक केले. तसेच, पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने सगळ्यांनी काम केले तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या निर्देशानुसार, कागदपत्रांची छाननी करून त्याची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे संगणक संचांचे नेटवर्क, त्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे तीन सत्रातील गट यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिकांचीही साथ मिळाली. समाज विकास विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच, अहोरात्र काम करून त्यांची ऑनलाईन तपासणी केली. अहोरात्र काम केल्याने विहित मुदतीत ही पडताळणी करणे शक्य झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *