ठाणे – अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या मा. नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने शनिवारी (दि. 28) सोल्जर रन चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“चला धाऊया, देशासाठी- सैनिकांच्या सन्मानासाठी” असे घोषवाक्य घेऊन “सोल्जर रन” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठामपा आयुक्त सौरभ राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायकल आणि धावणे अशा पद्धतीने या सोल्जर रनचे आयोजन करण्यात आले आहे. वयोगटानुसार 2,3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे. पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे डाॅ. सागर आंब्रे यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आंब्रे आणि स्नेहा आंब्रे यांचे विशेष योगदान लाभले आहे. तसेच, सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबविण्याचा आमचा मनोदय आहे, असेही डाॅ. आंब्रे यांनी सांगितले.