ठाणे – ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली `ब्राह्मण शिक्षण मंडळ’ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला आय.सी.एस.ई. बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली.
सन 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे. ठाणेभूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे. नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसे शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे.
ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिष्णू असाच आहे. महाराष्ट्र विद्यालय, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, कै. द. ल. मराठे प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक (वर्तकनगर), ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय (चरई) या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेता 1998 मध्ये घंटाळी येथे इंग्लिश मिडियम स्कूल आणि 2006 मध्ये जूनियर कॉलेज स्थापन करण्यात आले. 2019 मध्ये आय.सी.एस.ई. (CISCE) बोर्डाची ज्ञानानंद स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना वीर सावरकर पथ ठाणे येथे करण्यात आली आहे. या शाळेला आय.सी.एस.ई. बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनिअर केजी ते इयत्ता 9 वी पर्यंत वर्ग नवीन शैक्षणिक वर्षात सुरु होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली.
ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल, वातानुकुलीत आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष आयटी विभाग आहे. प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठे मैदान आहे. वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी आहे. अग्निसुरक्षा आणि सीसीटीव्हीचे जाळे येथे आहे. लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आकर्षक वर्ग सजवलेले आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमण, उपाध्यक्ष श्रीराम देव, खजिनदार सुभाष लिमये, विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे.