दिवा शहरातील पाणी प्रश्नावर आमरण उपोषण करत असलेल्या विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली.
दिवा शहरातील पाणी खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे टँकर माफिया आणि पाणी विकणाऱ्यांसोबत साटलोटं असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी आज मनसे कडून करण्यात आली. यावेळी दिवा शहरातील अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवून त्यांना बांधकामासाठी होणारा पाणी पुरवठा तात्काळ थांबवावा, टँकर माफिया आणि पाणी माफियांकडून होणारी पाणी चोरी थांबवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ज्या ठिकाणीं अधिकृत कनेक्शन असूनही पाणी येत नाही त्यांची पाण्याची बीलं माफ करण्यात यावीत, दिव्यातील सर्व पाण्याच्या जोडण्याना पाण्याचे मीटर बसविण्यात यावेत, दिवा परिसरातील आरक्षित जमिनींवर होणारे अतिक्रमण थांबवून त्या जागांवर पाण्याचे जलकुंभ उभारावेत अशा मागण्या शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोइर, शहर सचिव प्रशांत गावडे , विभाग अध्यक्ष शरद पाटील हे उपस्थित होते.