मनसेचे संदीप पाचंगे यांच्या मागणीनंतर पालिकेची कारवाई
*विहंग* जाहिरात कंपनीला ४४ लाखांचा दंड
ठाणे महापालिकेने शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या आणि महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ५२ जाहिरातदारांवर कारवाई करत त्यांना पाचपट दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईतून महापालिका तब्बल १० कोटी ९६ लाख १९ हजार ५७४ रूपये एवढा दंड वसूल करणार आहे. मंजुरीपेक्षा अधिक आकाराचे नियमांचे उल्लंघन करत उभारलेल्या फलकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे होत आहे.
महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने केली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्याने त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती त्यामुळे कारवाईला गती मिळाली आणि महापालिकेने ही कारवाई करण्यास पावलं उचलली आहेत. ठाणे महापालिकेने ५२ जाहिरात फलकांवर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात किती फलकांवर कारवाई झाली आणि उर्वरित फलकांचे काय झाले याबाबत स्पष्टता नव्हती.
या कारवाईमुळे बेकायदेशीर होर्डिंग रोखण्यास मदत होईल आणि शहराचे सौंदर्यही टिकून राहील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होणार नाही. होर्डिंग्जच्या नियंत्रणाबाबत ठोस धोरण आखण्याची आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत पाचंगे यांनी व्यक्त केले आहे.
———————
चौकट
घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वत्र होर्डिंग्जच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना ठाणे महापालिकेने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईत विहंग कंपनीला ४४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही खळखळ उडाली आहे.
————————