बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. आता त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आज मुंबईत संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मागण्याकरता सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पोलिसांना बदनाम केलं जातंय. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्य. मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झालंय की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.”