ठाणे – दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत साजरा केला जात आहे. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालमृत्यु कमी करणे, बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले.
यावर्षी जागतिक सप्ताहासाठी “आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने सर्व प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, नागरी दवाखाने या स्तरावर हिरकणी कक्षाचे बळकटीकरण करण्यात येणार असून मातांच्या गोपनीयता व सुरक्षेवर भर देण्यात येत आहे.
या सप्ताहाच्या अनुषंगाने प्रसूती विभागात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे जन्मानंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपानाची सुरुवात, कोलस्ट्रम फीडिंग, निव्वळ स्तनपान याबाबत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तसेच आरोग्य संस्था स्तरावर नवीन मातांना देखील स्तनपानाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.
Infant Milk Substitute Act (IMS act) अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना Milk formula food, दुधाची बाटली, मातेच्या दुधाला पर्यायी पदार्थ व आहार व उपकरणे यासारख्या बाबींना प्रोत्साहन न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
ग्रामीण भागामध्ये स्तनपान व शिशु पोषणाच्या पद्धतीमध्ये विशेष लक्ष दिले जात असून नियमित लासिकरणावेळी, स्तनदा व गरोदर माता ग्रहभेटीदरम्यान स्तनपानाबाबत आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी व आशामार्फत समुपदेशन केले जात असून स्तनदा मातांना आयर्न फोलीक एसिड व कॅल्शिअमच्या गोळ्यांचे १८० दिवस नियमित सेवन करण्याबाबत सांगितले जात आहे.
*जन्मानंतर पहिल्या तासात शिशुच्या आयुष्याची सोनेरी सुरुवात करण्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे*
-जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे.
-शिशुला मातेचे सुरुवातीचे घट्ट पिवळे दूध (चिकाचे दूध) देणे अतिशय महत्वाचे आहे.
-पहिले पिवळे दूध (चिक दूध) हे अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण करते. स्तनपान हे माता व बाळ यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करते तसेच बाळाच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाचे ठरते.
-सामान्य अथवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या प्रसूतिनंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे.
-सुरुवातीच्या काळात दिवसातून ८ ते १२ वेळा स्तनपान देण्यात यावे.
-जन्मानंतर मातेच्या त्वचेचा स्पर्श शिशुला त्वरित होणे आवश्यक आहे.
-रात्रंदिवस शिशुला मातेच्या संपर्कात ठेवणे आवश्यक आहे त्यांना वेगळ करता कामा नये.
-पहिले सहा महिने शिशुला निव्वळ स्तनपानच दिले गेले पाहिजे.
-स्तनपानाखेरीज शिशुला गुटी, मध, साखरेचे पानी किवा इतर पेय अजिबात देता कामा नये.
-स्तनदा मातांनी दररोज ३ वेळा जेवण करावे व त्याव्यतिरिक्त २ वेळा थोडे छोटेसे जेवण किंवा फराळ घ्यावा ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते.
पहिले ६ महीने निव्वळ स्तनपान देणे हे कुटुंबाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मातेला स्तनपान देण्यासाठी कुटुंबातील व्यक्तिनी प्रोत्साहन करण्यासोबतच मानसिक आधार देणेदेखील आवश्यक आहे. मातेला पौष्टिक आहार देण्यासोबतच तिला पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी कुटुंबाने घ्यायला हवी असे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी दिली.