४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

ठाणे महाराष्ट्र
४ लाख ५६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार; जिल्ह्यात ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
दि. २९ (जिल्हा परिषद, ठाणे)- ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  ठाणे  अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रोहन घुगे यांनी दिल्या आहेत.
       मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ५६ हजार ३५२ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला – मुलींमध्ये अनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी आजारांचा धोका उद्भवतो.  त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या एकत्रित सहभागाने व समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम शाळा व अंगणवाड्यामध्ये ४ डिसेंबर २०२४ व जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जी मुले उपस्थित राहणार नाहीत त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी (मॉप अप दिवशी) गोळ्या देऊन साजरा करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण ५ तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील ३६ प्राथमिक आरोग्य केंद्र, १ हजार ९११ अंगणवाडी, १ हजार ५४१ शासकीय शाळा, शासन अनुदानित २५५ शाळा, आश्रम शाळा ७१, खाजगी शाळा ३९८ आणि ३७ तांत्रिक संस्था व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे.
१ ते १९ वयोगटातील अंबरनाथ तालुक्यात १ लाख ५९ हजार ०६० अपेक्षित लाभार्थी, भिवंडी तालुक्यात १ लाख ०५ हजार २९१ अपेक्षित लाभार्थी, कल्याण तालुक्यात ५० हजार १८३ अपेक्षित लाभार्थी, मुरबाड तालुक्यात ५० हजार २७५ अपेक्षित लाभार्थी, शहापूर तालुक्यात ९१ हजार ५४३ अपेक्षित लाभार्थी असून एकूण ठाणे ग्रामीण भागात ४ लाख ५६ हजार ३५२ अपेक्षित लाभार्थी आहेत.
  या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर प्रशिक्षण दिले असून सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नोडल शिक्षक यांना प्रशिक्षण दिले आहे. या मोहिमेपासून एकही बालक वंचित राहणार नाही याबाबत आरोग्य विभागाकडून संबधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *